मालवण, दि. प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या विविध विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना (शिंदे गट) व भाजप यांचे वर्चस्व राहिले. पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर तर उपसभापती पदी सौ. अश्विनी कांदळकर आणि सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पदी पूनम चव्हाण यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. मुख्याधिकारी तथा पीठासीन अधिकारी प्रतीक थोरात यांनी या निवडी जाहीर केल्या. निवडीनंतर नगरपालिका परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात आलेली ही निवडणूक आज नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सकाळच्या सत्रात विविध पक्षांच्या वतीने समिती सदस्यांची नावे सादर करण्यात आली. दुपारी तीन वाजता सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. मात्र सर्व पदांवर एकमताने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांची निवड निश्चित झाली. या समितीवर सदस्य म्हणून शर्वरी पाटकर, मेघा सावंत, ललित चव्हाण व तपस्वी मयेकर यांची निवड करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम समितीवर सभापती म्हणून सहदेव बापर्डेकर तर सदस्य म्हणून मेघा सावंत, महेश कोयंडे, मंदार केणी व मंदार ओरसकर यांची निवड झाली. सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता समिती सभापती म्हणून पूनम चव्हाण तर सदस्य म्हणून सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, दर्शना कासवकर व अनिता गिरकर यांची निवड जाहीर करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर तर उपसभापती पदी अश्विनी कांदळकर यांची निवड झाली. सदस्य म्हणून भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर व अनिता गिरकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
यावेळी नगरपालिकेची स्थायी समितीही गठीत करण्यात आली. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष ममता वराडकर, उपाध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर तर सदस्य म्हणून सहदेव बापर्डेकर, पूनम चव्हाण व अन्वेशा आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन करताना मागील प्रशासकीय काळात पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनात निधीचा दुरुपयोग झाल्याचा आरोप केला. यापुढे निधीचा योग्य वापर होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महेश कांदळगावकर यांनीही यापूर्वीच्या काळात प्रशासनाकडून योग्य कारभार झाला नसल्याची टीका करत, आता सर्वांनी मिळून नगरपालिकेत सुयोग्य कारभार घडवून आणावा, असे आवाहन केले.
नूतन आरोग्य व स्वच्छता समिती सभापती पूनम चव्हाण यांनी स्वच्छता व आरोग्य विभागातील त्रुटी दूर करून निधीचा अपव्यय होणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने काम करून मालवण शहराला नवी उंची प्राप्त करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी रविकिरण तोरसकर यांनी मालवणमधील पर्यटनाचा विचार करता स्वतंत्र पर्यटन समिती स्थापन करण्याची सूचना मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.







