मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक तसेच राष्ट्रीय अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून राज्याच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली होती. आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या हाती आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांचे राजकीय स्थान अधिक मजबूत झाले आहे.
आगामी निवडणुका, बदलते राजकीय समीकरणे आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील आव्हाने लक्षात घेता सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व पक्षासाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनबांधणी आणि राजकीय रणनीती कशा राबवल्या जातील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




