मालवण (प्रतिनिधी) –
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी… जय शिवाजी”, “धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा विजय असो”, “खासदार नारायणराव राणे यांचा विजय असो”, “एकनाथ शिंदे यांचा विजय असो”, “आमदार निलेश राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है”, “दत्ता तिथे सत्ता” अशा जोरदार घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत आज मालवण शहराचा आसमंत दणाणून गेला. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी जल्लोषी वातावरणात मालवण नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला.

नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर वंदन करून तसेच नगराध्यक्षांच्या खुर्चीला नतमस्तक होत सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, हितचिंतक तसेच नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी व औक्षण करत नूतन नगराध्यक्षेचे स्वागत केले.

यावेळी शिवसेनेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, दीपक पाटकर, भाग्यश्री मयेकर, मेघा सावंत, पूनम चव्हाण, शर्वरी पाटकर, नीना मुंबरकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव आदींचेही नगरपालिकेत स्वागत करण्यात आले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर म्हणाल्या, “माझा विजय हा जनतेचा विजय आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास येत्या पाच वर्षांत शहरातील विकासकामे आणि जनतेच्या सेवेतून सार्थ करून दाखवू.” मालवणचा कारभार पारदर्शक, गतिमान आणि विकासाभिमुख ठेवण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, उमेश नेरुरकर, राजा गांवकर, बाळू तारी, बाळू नाटेकर, परशुराम पाटकर, अंकित नेरुरकर, स्वप्नाली नेरुरकर, जगदीश गावकर, सूर्यकांत फणसेकर, विश्वास गावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, नगराध्यक्ष सौ. ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजपचे नगरसेवक मंदार केणी, अन्वेषा आचरेकर, महानंदा खानोलकर, ललित चव्हाण तसेच उबाठा शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, अनिता गिरकर आणि महेंद्र म्हाडगूत यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.





