Malvan Kumbharmath burglary: Thieves broke into a locked house while the family had gone to Anganewadi Yatra and stole a gold necklace . Police have registered a case
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ सागरी महामार्ग परिसरात राहणाऱ्या मुस्ताक शरफुद्दीन अथनीकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचा हार लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मुस्ताक शरफुद्दीन अथनीकर (वय ५०, रा. कुंभारमाठ, सागरी महामार्ग, मालवण) हे ९ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी कुटुंबासह रात्री सुमारे ११ वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. १० फेब्रुवारी रोजी पहाटे सुमारे ४ वाजता घरी परतल्यानंतर घराच्या हॉलमधील स्लायडिंग खिडकीची काच फोडलेली आढळून आली.
घरात प्रवेश केल्यानंतर किचनमधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच बेडरूममधील पत्र्याच्या कपाटाचा लॉकर उचकटून फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता, लॉकरमध्ये ठेवलेला सुमारे १२ ग्रॅम वजनाचा किमती सोन्याचा हार चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.





