मालवण : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत ‘इंग्लिश डिबेट’ या वादविवाद प्रकारात कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे विद्यार्थी सहिष्णू सुयोग पंडित आणि लिऑन पिंटो यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेची अंतिम फेरी ८ सप्टेंबर २०२६ रोजी चर्चगेट येथील विद्यार्थी विद्यापीठ भवनात पार पडली. विविध महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेत सहिष्णू पंडित आणि लिऑन पिंटो यांनी प्रभावी मांडणी व युक्तिवादाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवला.
सहिष्णू सुयोग पंडित हे मालवणचे रहिवासी असून, त्यांच्या या यशामुळे मालवण तसेच सिंधुदुर्गच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजचे चेअरमन व्हिक्टर डांटस, प्राचार्य डॉ. शिल्पा मर्गज, प्राध्यापक संग्राम गावडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग यांनी सहिष्णू पंडित आणि लिऑन पिंटो यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






