Smiles, dance, and culture filled the stage as Kale Aaji Shishuvihar Kindergarten’s annual gathering was celebrated in Malvan.
मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमधील काळे आजी शिशुविहार बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच स्व. काळे आजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी बालवाडीच्या संचालिका सौ. मालती काळे व श्रीधर काळे यांच्यासह शिक्षकवृंद व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर काळे यांनी केले.
‘भारताचे सांस्कृतिक दर्शन’ ही या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. लहान व मोठ्या गटातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी, पारंपारिक व लोकगीतांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारातून भारतातील प्रांतिक व सांस्कृतिक विविधता प्रभावीपणे मांडली. काही विद्यार्थ्यांनी गायन, अभिनय व वक्तृत्वगुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्याविष्काराने विशेष आकर्षण निर्माण केले.
नृत्यांच्या कोरीयोग्राफीसाठी सिद्धेश पालव, केतकी सावजी, हर्षदा मेस्त्री, भाग्यश्री फोंडबा, भावना माजिक, सौ. विशाखा परुळेकर तसेच मुख्याध्यापिका सौ. कमल बांदकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. कमल बांदकर, सौ. शर्वरी घाडी, निशा बिडये, सौ. शालन सावंत, स्वप्ना म्हापणकर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीधर काळे यांनी मानले. या प्रसंगी पालक, माजी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







