Malvan Kumbharmath road accident: A 25-year-old motorcyclist died on the spot after being hit by a Tata Sumo late at night. Police have registered a case against the Sumo driver. Read details.
मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथे टाटा सुमोने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन नारायण राठोड (वय २५, रा. मालवण) हा तरुण जागीच ठार झाला. हा भीषण अपघात काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मालवण–कसाल मार्गावरील कुंभारमाठ येथील म्हाडा कॉलनी तिठ्यावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा सुमो (MH-08-Z-8010) ही गाडी भरधाव वेगात येत रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन मोटारसायकलस्वार सचिन राठोड याला जोरदार धडकली. धडकेनंतर सचिन राठोड रस्त्यावर कोसळला. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मयताचा भाऊ किरण नामदेव राठोड यांनी मालवण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सुमो चालक देवप्पा श्रीमंत करपे (वय २५, रा. विजापूर, कर्नाटक) हा मद्यप्राशन करून भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार आरोपी सुमो चालकाविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १०६, १२५ (a), १२५ (b), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व १८५ अन्वये मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे करत आहेत.





