Akkalkot Swami Samarth Vatvruksha Devasthan President Mahesh Ingle visits Anganewadi Bharadi Devi Yatra in Malvan and praises the grand planning of the yatra. Read full news.
मालवण दिनांक १०: प्रफुल्ल देसाई
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा महिमा भारतासह जगभरात पसरला असून कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पावन भूमीत येऊन देवीच्या चरणी नतमस्तक होण्याचा योग लाभला, असे प्रतिपादन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले. लाखो भाविक उपस्थित राहणाऱ्या आंगणेवाडी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन आंगणे मंडळाने केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
महेश इंगळे यांनी आज सायंकाळी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी आंगणेवाडी मंडळातर्फे त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, सतीश आंगणे, आनंद आंगणे, स्वामीभक्त व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी यांच्यासह बाबासाहेब निंबाळकर, डॉ. पाटील, देवर मुनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश इंगळे म्हणाले की, आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे स्थान स्वयंभू असून तिची महती आणि यात्रेची कीर्ती देश-विदेशात पोहोचली आहे. अशा पवित्र यात्रेला उपस्थित राहण्याचा योग लाभल्याने समाधान वाटते. सर्वांच्या सुख-शांतीसाठी भराडी देवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की, श्री स्वामी समर्थ आणि कोकण यांचे नाते अतिशय जुने आहे. स्वामी समर्थ यांचे कोकणात वास्तव्य होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वामी समर्थांच्या विविध मठांना भेट देण्याचा योग लाभत असून कोकणातून दरवर्षी हजारो स्वामीभक्त अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. श्री भराडी देवी आणि श्री स्वामी समर्थ यांचा कृपाशिर्वाद सर्व भक्तांवर कायम राहो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.







