कणकवली तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत महायुतीने ठाकरे शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार हेलन कांबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
याआधीच बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघात उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरल्याने भाजपच्या संजना राणे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर वरवडे पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुधीर सावंत व मनसेचे उमेदवार शरद शेलार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातही उबाठा सेनेचे उमेदवार मीनल तळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या सलग घडामोडींमुळे कणकवली तालुक्यात महायुतीने वर्चस्व प्रस्थापित करत ठाकरे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का दिला आहे. विशेष म्हणजे २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून, तोपर्यंत आणखी कोणते राजकीय धक्के बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचा मतदारसंघ असणारा कणकवली मतदारसंघ यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला बनण्याकडे वाटचाल करु लागला आहे,
कणकवली तालुक्यातील या घडामोडींमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.





