बांदा | प्रतिनिधी
बांदा–रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सिद्धीच्या अकाली जाण्याने संपूर्ण बांदा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सातत्याने झुंज देत असतानाही सिद्धीने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर उभे केले होते. रक्ताचा कर्करोग आणि त्यानंतर ब्रेन कॅन्सरसारख्या कठीण आजाराशी सामना करत असतानाही तिने हार मानली नाही. उपचार सुरू असतानाही अभ्यासात सातत्य राखत तिने नीट परीक्षेत ६६४ गुण मिळवत कोकण विभागात अव्वल ठरण्याचा गौरव मिळवला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती शेवटपर्यंत ध्येयासाठी झटत राहिली.
सिद्धीच्या निधनाने केवळ एक गुणवंत विद्यार्थिनीच नव्हे, तर असामान्य संघर्ष करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तिच्या संघर्षातून अनेक रुग्णांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना आशा व बळ मिळाले होते.
आज तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार, शिक्षकवर्ग आणि बांदा पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्या आठवणींना उजाळा देत अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली. आज दुपारी येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा भिडे कोचिंग क्लासेसचे संचालक शिवानंद भिडे यांची ती कन्या होती. तिच्या पश्चात आई-वडील व आप्तपरिवार आहे.
सिद्धी भिडे ही जिद्द, धैर्य आणि संघर्षाची जिवंत प्रेरणा होती. तिच्या आठवणी आणि कार्य अनेकांच्या आयुष्यात कायम प्रेरणादायी ठरतील.





