मालवण, दि. प्रतिनिधी :
“आम्ही खासदार नारायण राणे यांचे आदेश मानणारे आहोत; मात्र कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात एबी फॉर्म दिले जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. प्रसंगी माझ्या देहाचे बलिदान देईन, पण कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही,” असा खळबळजनक इशारा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला. महायुतीमध्ये भाजपला सुटलेल्या जागांव्यतिरिक्त छुप्या पद्धतीने एबी फॉर्म देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी थेट महायुतीतील अंतर्गत वादाला वाचा फोडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप आणि एबी फॉर्मवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चिंदरकर बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेवक मंदार केणी यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
चिंदरकर म्हणाले की, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मसुरे, आडवली-मालडी, चिंदर, कोळंब, देवबाग, सुकळवाड व वराड या जागांचे एबी फॉर्म माझ्याकडे सुपूर्द केले होते. युतीमध्ये भाजपला सुटलेल्या जागांव्यतिरिक्त कोणालाही फॉर्म देऊ नका, अशा स्पष्ट सूचना असतानाही भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने एबी फॉर्म दिले गेले. हा प्रकार थेट पक्षादेशाला तिलांजली देणारा असून, हे कृत्य करणाऱ्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर खासदार नारायण राणे कारवाई करणार का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “मालवण नगरपालिकेपासून आजपर्यंत मी संयम राखला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत विरोधकांना अंगावर घेऊन लढण्याचे काम आम्ही केले. मालवणमध्ये सहा जिल्हा परिषद जागांपैकी किमान तीन जागांची आमची मागणी होती. मात्र केवळ एकच जागा देऊन भाजपची बोळवण करण्यात आली. भाजप मालवणमध्ये जिवंत ठेवायचा आहे की शिंदे सेनेला दान करायचा आहे?”
“नारायण राणे नेहमी लढणारे कार्यकर्ते व्हा, असे सांगतात. आम्ही लढणारेच आहोत. आमच्या व्यथांची दखल घेतली नाही, तर भाजप कार्यकर्ते सहाही जागांवर निवडणूक लढवतील,” असा स्पष्ट इशाराही चिंदरकर यांनी दिला.
भाजप कार्यकर्त्यांविरोधात एबी फॉर्म टाकणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे सांगत, युतीचे नेते म्हणून खासदार नारायण राणे यांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. “मी राजीनामा देऊन पळ काढणार नाही, तर पक्षात राहूनच अन्यायाविरोधात लढणार आहे. मी आज फक्त दोन टक्केच बोललो आहे; वेळ आल्यावर उरलेले ९८ टक्के बाहेर काढीन,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
गेल्या वर्षभरापासून भाजप कार्यकर्त्यांना ‘ना घर का ना घाट का’ अशी वागणूक मिळत असल्याचा आरोप करत, ही परिस्थिती बदलली नाही तर कार्यकर्त्यांच्या भावना उफाळून येतील आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी वरिष्ठांची असेल, असा गंभीर इशाराही चिंदरकर यांनी दिल्याने महायुतीतील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला आहे.







