मालवण, दि. प्रतिनिधी :
मालवण शहरातील तारकर्ली–मालवण मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसरात असलेला बीएसएनएलचा जुना पोल व नादुरुस्त उपकरणे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. हा पोल तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या पूनम चव्हाण यांनी दूरसंचार विभागाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
मालवण प्रभाग क्र. ४ मधील रांगोळी महाराज मठ परिसरातील मुख्य रस्त्यावर बीएसएनएलचा हा पोल थेट वाहतुकीच्या मार्गात येतो. या रस्त्यावरून मोठी व लहान वाहने, तसेच पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. मात्र या पोलमुळे वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत असून, त्यामुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच अपघाताची शक्यता देखील वाढली आहे.
या ठिकाणी पोलसोबतच बीएसएनएलचे एक बंद पडलेले उपकरण अनेक दिवसांपासून पडून असून, तेही रस्त्यालगत अडथळा ठरत आहे. त्यामुळे वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असून, हा अडथळा तातडीने दूर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मालवण हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक ये-जा करतात. त्यामुळे पर्यटकांच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पोल व नादुरुस्त उपकरणे तात्काळ हटवणे आवश्यक असल्याचे पूनम चव्हाण यांनी नमूद केले आहे.
हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांच्या सुरक्षिततेशी संबंधित असून, दूरसंचार विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्यासह नगरसेवक सहदेव बापर्डेकर, सिद्धार्थ जाधव, नगरसेविका मेघा गावकर, अश्विनी कांदळकर, शेखर गाड, अमित सावंत आदी उपस्थित होते.






