मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी मनसे तसेच शिवसेना (ठाकरे गट)च्या निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, यावेळी मनसेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यामुळे खचून जाणाऱ्यांत आपण नाही. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते आपल्या-आपल्या प्रभागांमध्ये सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठी माणसाच्या विरोधात काही घडताना दिसले, तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, हेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
मनसेची लढाई ही मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले की, हीच लढाई हे आपले अस्तित्व आहे. अशा लढाया दीर्घकालीन असतात, याचे भान सर्व कार्यकर्त्यांना आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीत काय चुकले, काय राहून गेले, काय कमी पडले आणि पुढे काय करावे लागेल याचे विश्लेषण आणि त्यानुसार कृती आपण सर्वजण मिळून करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच एमएमआर परिसरात असो किंवा एकूणच राज्यात, मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
“निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे, हे विसरायचं नाही,” असे आवाहन करत राज ठाकरे यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संदेश दिला. नव्याने पक्ष आणि संघटना उभारूया, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने पुढे जाण्याचे आवाहन केले आहे.






