मालवण (प्रतिनिधी) –
मालवणच्या दांडी किनाऱ्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी होऊन परिसरात एकच खळबळ उडाली. पर्यटकांच्या समोरच झालेल्या या फ्री-स्टाईल राड्यात बाटल्या, दांडे आणि हाताला मिळेल त्या वस्तूंचा वापर झाल्याची चर्चा असून अनेक जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्रथमदर्शनी शुल्लक कारणावरून वाद पेटल्याचे भासले तरी, दिवाळीतील नरकासूर प्रतिमेवरून झालेल्या वादातून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्याचा हा स्फोट असल्याची खुलेआम चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दांडी भागात मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोन युवकांनी आपल्या भागातीलच दोघांना हुल देत दांडी किनाऱ्याच्या दिशेने वाटचाल केली. या प्रकारावरून जाब विचारण्यासाठी समोरच्या गटाने विचारणा केली असता शाब्दिक चकमक उडाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. दांडे व इतर साधनांच्या सहाय्याने मोटारसायकलवरून हुल देणाऱ्या युवकांना जबर मारहाण करण्यात आली.
ही बातमी किनारपट्टीवर वाऱ्यासारखी पसरताच दुसरा गट घटनास्थळी दाखल झाला आणि मारहाण करणाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर सुमारे तासभर दांडी किनाऱ्यावर फ्री-स्टाईल हाणामारी सुरू राहिली. या राड्यात दोन्ही गटांतील अनेक जणांना मार बसला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मालवण पोलीस स्थानकात दोन्ही गटांचे जमाव दाखल झाले होते. दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पर्यटकांच्या उपस्थितीत झालेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले असून ‘भांडण नरकासुराचं, पण कांडाप पोरांचा’ अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.







