मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तब्बल १२८ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आणि उद्या असे केवळ दोनच दिवस शिल्लक असताना, भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी आणि अंतर्गत नाराजी कमी ठेवण्यासाठी पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत यादी जाहीर न करण्याची रणनीती अवलंबल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, रविवारी रात्रीपासून दादर येथील वसंतस्मृती कार्यालयातून भाजपच्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होईल, त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी संबंधित आमदारांवर सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आघाडीवर असलेले भाजपचे माध्यम प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नवनाथ बन यांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नवनाथ बन हे वॉर्ड क्रमांक १३५ मधून निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून शिवसेनेचा विजय झाला होता.
भाजपच्या या निर्णयामुळे मुंबईतील निवडणूक रणधुमाळी अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, उमेदवारी यादी जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.






