नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निकालानंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी मिशन मोड सुरू केला आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मंगळवार, २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये एकत्र लढायचे की स्वतंत्र, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबईत महायुतीमध्ये अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही, यावरून संभ्रम कायम आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी उद्धव ठाकरे गट काँग्रेसचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांसह इतर पालिकांमध्येही युती-आघाडीबाबत अद्याप स्पष्ट चित्र नाही. काही ठिकाणी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापौरपदाची सोडत अजून बाकी
महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असली तरी महापौरपदाची सोडत अद्याप जाहीर झालेली नाही. सोडत निघाल्यानंतर कोणत्या महापालिकेतील महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आणि कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल, हे स्पष्ट होणार आहे.
ईव्हीएमवर अपक्षांची नावे शेवटी
आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ईव्हीएमवर प्रथम राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार, तर अपक्ष उमेदवारांची नावे सर्वात शेवटी असतील.
उमेदवारी अर्ज ऑफलाइनच
राज्य निवडणूक आयोगाने संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी राजकीय पक्षांच्या मागणीनुसार महापालिका निवडणुकांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करता येणार आहेत.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
- अर्ज भरण्यास प्रारंभ: २३ डिसेंबर
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत: ३० डिसेंबर
- अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर
- अर्ज मागे घेण्याची मुदत: २ जानेवारी २०२६
- चिन्हवाटप व अंतिम यादी: ३ जानेवारी २०२६
- मतदान: १५ जानेवारी २०२६
- मतमोजणी: १६ जानेवारी २०२६
राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या या महापालिका निवडणुका युती, आघाडी आणि स्वबळाच्या समीकरणांमुळे अधिकच रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.





