मालवण |
राज्यात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेची ठरलेली मालवण नगरपालिका निवडणूक अखेर इतिहास घडवून गेली. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी नगराध्यक्षासह दहा नगरसेवक विजयी करून दाखवत आपली राजकीय ताकद निर्विवादपणे सिद्ध केली.
ही केवळ निवडणूक जिंकण्याची गोष्ट नाही, तर राजकीय आत्मविश्वास, रणनीती आणि प्रतिस्पर्ध्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा निकाल आहे.
भाजपच्या म्हणण्यानुसार मालवणात “शून्य” असलेली शिंदे शिवसेना, नगराध्यक्षासह तब्बल ५० टक्के नगरसेवक निवडून आणते, हा केवळ निकाल नाही तर चमत्कारच म्हणावा लागेल. या निकालाने भाजप आणि उबाठा शिवसेना — दोन्ही पक्षांची राजकीय गणिते कोलमडली.
अतिशहाणपणाची किंमत भाजपला मोजावी लागली
निवडणुकीआधी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेनेबाबत दाखवलेला अतिशहाणपणा आणि डिवचणारी भाषा, याच निवडणुकीत भाजपच्या अंगाशी आली, हा या निकालाचा स्पष्ट अन्वयार्थ आहे.
“मालवणात शिंदे शिवसेना शून्य आहे” अशी विधाने, पत्रकार परिषदांमधून केलेली खिल्ली आणि नगराध्यक्षपदावर एकाधिकाराची भाषा — या साऱ्याचा उलटा परिणाम मतपेटीतून दिसून आला.
दत्ता सामंताना गृहीत धरण्याची विरोधकांना चुक भोवली
या निवडणुकीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांची जोडी निर्णायक ठरली.
“शून्यालाही किंमत असते आणि ती दाखवून देऊ,” असे दत्ता सामंत यांनी सूचकपणे सांगितले होते — आणि ते त्यांनी करून दाखवले.
गेल्या २०–२५ वर्षांच्या सिंधुदुर्गच्या राजकारणात “दत्ता तिथे सत्ता” हे समीकरण अनेकदा खरे ठरले आहे. याच अनुभवाच्या जोरावर, आमदार निलेश राणे यांच्या मुत्सद्देगिरीच्या साथीने शिंदे शिवसेनेने मालवणमध्ये भाजपला काही प्रभागांत उमेदवार शोधायला लावले.
पक्षप्रवेश, धक्का तंत्र आणि संघटनात्मक ताकद
निवडणूक काळात भाजप आणि उबाठा शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश, हे या निवडणुकीतील निर्णायक वळण ठरले.
दत्ता सामंत यांनी उमेदवारीसाठी संपर्काचे आवाहन करताच उमेदवारांची लागलेली रिघ — शिंदे शिवसेनेची वाढती ताकद अधोरेखित करणारी होती.
जातप्रमाणपत्र बॉम्ब आणि राजकीय परिणाम
उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या ओबीसी जातप्रमाणपत्रावर उपस्थित केलेला प्रश्न, हा निवडणुकीतील टर्निंग पॉइंट ठरला.
हा आरोप एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने नव्हे, तर लोकप्रतिनिधीने केल्याने त्याला वेगळेच वजन मिळाले. परिणामी, शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर यांचा विजय अधिक सुकर झाला.
विकासाची अष्टसूत्री आणि विश्वासार्ह नेतृत्व
निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या प्रतिष्ठित नागरिकांसमोर मांडलेली शहर विकासाची अष्टसूत्री, ही केवळ घोषणा नव्हती; तर भविष्यासाठीचा स्पष्ट रोडमॅप होती.
याच विश्वासार्हतेचा फायदा शिंदे शिवसेनेला मतपेटीतून मिळाला.
स्टिंग ऑपरेशनचा स्फोट
निवडणुकीच्या दोन दिवस आधी भाजपवर लाखो रुपये वाटपासाठी आणल्याचा आरोप करत केलेले स्टिंग ऑपरेशन, यामुळे केवळ मालवण नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि राज्यात राजकीय खळबळ उडाली.
या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी मोठे नेते उतरवले, प्रचाराच्या सभा झडल्या; पण निकालाने आमदार निलेश राणेंची बाजी स्पष्ट केली.
अंतिम निकाल : मालवणचा कौल स्पष्ट
- शिंदे शिवसेना : नगराध्यक्ष + १० नगरसेवक
- भाजप : ५ जागा
- उबाठा शिवसेना : ४ जागा
- अपक्ष : १ (माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर)
मालवण नगरपालिका निवडणूक निकालाने एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली आहे —
मालवण आता शिंदे शिवसेनेचा, आणि त्याहूनही अधिक म्हणजे आमदार निलेश राणे यांचा बालेकिल्ला बनला आहे.
ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर राजकीय आत्मविश्वास, संघटन कौशल्य आणि योग्य वेळी योग्य चाल टाकण्याची शिकवण देणारी ठरली आहे.





