मुंबई | २२ डिसेंबर २०२५
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला एकूणच यश मिळाले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपला बसलेल्या धक्क्याने आता नवे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. या पराभवानंतर भाजपचे नेते व राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर केलेल्या एका अर्थपूर्ण पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे,
“गप्प होतो… पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी… पण काही गोष्टी बोलल्या नाहीत तर त्या खऱ्या वाटायला लागतात… पण आता ती वेळ आली आहे!”
या सूचक वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, कुटुंबीयांतील राजकीय मतभेद आणि कणकवलीतील पराभवाची पार्श्वभूमी यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे संदेश पारकर यांनी १४५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. हा विजय शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांच्या पाठिंब्याने मिळाल्याचे स्पष्ट झाले असून, या निवडणुकीत नितेश राणे समर्थित भाजप उमेदवाराचा पराभव झाला.
तर मालवण नगरपालिका निकालानंतर निलेश राणे यांनी विजयाचे श्रेय थेट मतदारांना देत, “मतदार आमच्यासोबत ठाम उभे राहिले,” अशी प्रतिक्रिया दिली. याआधीच त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर, पैशांच्या वाटपाच्या आरोपांवर आणि प्रदेश नेतृत्वावर टीका केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने मोठी आघाडी घेतली असून, भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. यामुळे महायुतीतील भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत तणाव अधिक ठळकपणे समोर आला आहे. नितेश राणे यांची पोस्ट ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून, ती पक्षांतर्गत अस्वस्थतेचे संकेत देणारी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पराभवानंतर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “कणकवलीत भाजपची जागा हरल्याचे दुःख आहे. कुटुंब एका बाजूला, निवडणूक एका बाजूला… हा जनतेचा विजय आहे.” मात्र त्यांच्या पोस्टमधील आशय पाहता पुढील काळात ते अधिक स्पष्ट भूमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुती सरकारसाठी हा वाद नवा डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक यशाचे श्रेय विकासाच्या अजेंडाला देत असताना, दुसरीकडे सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यातील अंतर्गत कलह महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो आहे.
राणे बंधूंमधील हे मतभेद नक्की नसले तरी कोकणातील राजकारणाला आता नवी दिशा मिळणार की, महायुतीत समन्वय साधला जाईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






