मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत सातव्यांदा निवडून येत जनतेने माझ्या कामाची पावती दिली असून, माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष व प्रभाग ७ मधील विजयी अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांनी केली आहे.
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सुदेश आचरेकर म्हणाले की, मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत मी सात वेळा निवडून आलो आहे. माझ्या प्रभागात मी केलेल्या विकासकामांची पोचपावती जनतेने मला दिली आहे. भाजपने माझ्यावर अन्याय करत भाडोत्री लोक आणून निवडणूक लढवली. त्यामुळेच आज मालवण शहरात भाजपला हद्दपार व्हावे लागले, असा आरोपही त्यांनी केला.
आचरेकर पुढे म्हणाले की, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ७ सर्वांचे केंद्रबिंदू बनले होते. या निवडणुकीत मला मित्रमंडळी, कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची भक्कम साथ लाभली. पत्नी स्नेहा आचरेकर व सतीश आचरेकर, तसेच माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलेले सहकारी यांच्यामुळे हा विजय शक्य झाला.
भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाकडे कुशल नेतृत्व नसल्याने ते भाडोत्री नेतृत्व घेऊन याठिकाणी लढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र मालवणच्या जनतेने भाजपवर ‘हद्दपार’ करण्याची वेळ आणली. कारण फक्त एकच – भाडोत्री लोक. जे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले, त्यांना फक्त निवडणूक लढवायची माहिती आहे, जनतेची मदत करायची कळकळ नाही, असा घणाघात त्यांनी केला.
मालवण नगराध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित असताना भाजपने मराठा समाजाचा उमेदवार दिल्याने ओबीसी समाज एकवटला आणि मतदारांनी एकजुटीने मतदान करत भाजपचा पराभव केला. भाजपने याचे आत्मपरीक्षण करावे. भाडोत्री लोकांना आणून निवडणूक जिंकता येत नाही, हे पुन्हा एकदा मालवणच्या जनतेने दाखवून दिले, असे सुदेश आचरेकर यांनी ठामपणे सांगितले.





