संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत अखेर सत्तेचा कौल स्पष्ट झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मालवण नगरपरिषदेवर आपला भगवा झेंडा दिमाखात फडकावला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सौ. ममता मनमोहन वराडकर यांनी उबाठा शिवसेनेच्या उमेदवार पूजा करलकर यांचा तब्बल १०२२ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
या निकालाने मालवणच्या राजकारणात स्पष्ट संदेश दिला आहे—मतदारांनी नेतृत्व, स्थैर्य आणि विकासाच्या राजकारणालाच पसंती दिली आहे. नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेला १० जागा मिळाल्या असून, भाजपने ५ जागांवर विजय मिळवला आहे. उबाठा शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर १ जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या आकडेवारीतूनच मालवण नगरपरिषदेत महायुतीचे पारडे जड असल्याचे स्पष्ट होते. त्याचवेळी सुदेश आचरेकर यांनी सर्वांच्या विरोधात पुन्हा एकदा अपक्ष रिंगणात राहून विजयश्री संपादन करत आपली वनसाई़ड कॅप्टनशीप कायम राखली आहे. मंदार केणी, दीपक पाटकर, शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, सहदेव बापर्डेकर हे अनुभवी चेहरे आणि त्यांच्यासोबत अन्वेषा आचरेकर, मंदार ओरसकर, तेजस्वी मयेकर, ललीत चव्हाण असे नवे चेहरे आल्याने नव्या जुन्याचा संगम मालवणकरांनी निकालातून साधला आहे.
विशेष म्हणजे ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित नव्हती, तर ती शिवसेनेच्या दोन गटांमधील ताकद तपासणारी राजकीय लढत ठरली. या लढतीत आमदार निलेश राणे यांचे नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रश्नांवरची पकड निर्णायक ठरली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगलेली ही निवडणूक अखेर शिवसेनेच्या बाजूने झुकली.
मालवण नगरपरिषद – विजयी उमेदवारांचा तपशील
प्रभाग १
मंदार केणी – भाजप
दर्शना कासवकर – भाजप
प्रभाग २
ललित चव्हाण – भाजप
अनिता गिरकर – उबाठा शिवसेना
प्रभाग ३
दीपक पाटकर – शिंदे शिवसेना
नीना मुंबरकर – शिंदे शिवसेना
प्रभाग ४
सिद्धार्थ जाधव – शिंदे शिवसेना
पूनम चव्हाण – शिंदे शिवसेना
प्रभाग ५
महेंद्र म्हाडगुत – उबाठा शिवसेना
महानंदा खानोलकर – भाजप
प्रभाग ६
सहदेव बापर्डेकर – शिंदे शिवसेना
अश्विनी कांदळकर – शिंदे शिवसेना
प्रभाग ७
सुदेश आचरेकर – अपक्ष
मेघा गावंकर – शिंदे शिवसेना
प्रभाग ८
मंदार ओरसकर – उबाठा शिवसेना
शर्वरी पाटकर – शिंदे शिवसेना
प्रभाग ९
अन्वेषा आचरेकर – भाजप
महेश कोयंडे – शिंदे शिवसेना
प्रभाग १०
तपस्वी मयेकर – उबाठा शिवसेना
भाग्यश्री मयेकर – शिंदे शिवसेना
या निकालातून मालवणच्या मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. केवळ भावनिक राजकारण नव्हे, तर प्रभावी नेतृत्व आणि विकासाभिमुख धोरणांनाच पसंती दिली जात असल्याचा हा संदेश आहे. शिंदे शिवसेनेसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा असून, उबाठा शिवसेनेसाठी आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे.मालवण नगरपरिषदेचा हा कौल आगामी जिल्हा व राज्यस्तरीय राजकारणातही पडसाद उमटवणारा ठरणार असून, कोकणातील सत्तासमीकरणांवर त्याचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही.






