सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तासमीकरण बदलणारा ठरलेला नाही, तर त्यातून सावंतवाडीच्या राजकारणात नव्या शक्तिकेंद्राचा स्पष्ट उदय झाला आहे. या बदलाचा केंद्रबिंदू ठरले आहेत भाजपचे युवा नेते विशाल परब. थेट उमेदवार नसतानाही, निवडणूक निकालावर निर्णायक प्रभाव टाकणारा नेता म्हणजेच ‘किंगमेकर’—ही भूमिका परब यांनी या निवडणुकीत प्रभावीपणे निभावली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेला राजकीय संघर्ष हा उघड गुपित आहे. मंत्री दीपक केसरकर आणि भाजपच्या स्थानिक युवा नेतृत्वातील दरी दिवसेंदिवस अधिक ठळक होत असताना, विशाल परब यांनी या संघर्षातून माघार न घेता आपली स्वतंत्र राजकीय ताकद अधोरेखित केली. काही काळापूर्वी विधानसभा निवडणुकीत बंडखोर म्हणून मिळवलेली लक्षणीय मते ही केवळ आकडेमोड नव्हती, तर सावंतवाडीच्या राजकारणात ‘परब फॅक्टर’ अस्तित्वात असल्याचा ठोस पुरावा होता.
नगरपरिषद निवडणुकीत या ‘परब फॅक्टर’चा प्रत्यक्ष अनुभव आला. तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा त्यांचा आग्रह, पारंपरिक राजकारणाला छेद देणारा होता. त्यामुळेच केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येच नव्हे, तर नव्या मतदारांमध्येही उत्साह संचारला. धारदार प्रचारशैली, कॉर्नर सभा, थेट संवाद आणि रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते या सर्वांचा मेळ घालून परब यांनी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती केली.
महत्त्वाचे म्हणजे, स्थानिक मतभेद असूनही भाजप नेतृत्वाने विशाल परब आणि त्यांच्या गटाला डावलण्याऐवजी सामावून घेण्याची भूमिका घेतली. हा निर्णय भाजपसाठी राजकीयदृष्ट्या लाभदायक ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले. ज्या जागांवर भाजपची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली, तिथे परब यांच्या युवा यंत्रणेचा ठसा ठळकपणे दिसतो.
या निकालाने एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध केली आहे
सावंतवाडीच्या राजकारणातील स्थानिक समीकरणे आता विशाल परब यांना बाजूला ठेवून मांडता येणार नाहीत. ते केवळ भाजपचे युवा नेते राहिले नसून, मतांचे ध्रुवीकरण करणारे आणि सत्ता-समीकरणे ठरवणारे महत्त्वाचे केंद्र बनले आहेत.
आगामी काळात हा ‘किंगमेकर’ फॅक्टर भाजपसाठी किती निर्णायक ठरतो, आणि सावंतवाडीतील सत्तासंघर्षाला कोणती नवी दिशा देतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र आजच्या घडीला एवढे मात्र नक्की
सावंतवाडीचा कौल हा विशाल परब यांच्या राजकीय उंचीची नवी पायरी ठरला आहे.





