सिंधुदुर्ग प्रतिनिधी |
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या निकालांकडे केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ‘सत्तेचा ‘धुरंधर’ कोण’ ? हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वेंगुर्ला आदी नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप–शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा)–काँग्रेस या आघाड्यांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोप–प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि स्थानिक मुद्द्यांवर जोरदार रणधुमाळी उडाली होती.
नगराध्यक्षपदासाठी विविध पक्षांचे दिग्गज उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विकास, पायाभूत सुविधा, पर्यटन, रोजगार आणि शहराच्या भविष्यातील दिशा हे मुद्दे निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही ठिकाणी अत्यंत अटीतटीची लढत असल्याने मतमोजणी उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाचा चेहरा बदलणार की विद्यमान सत्ताधारी आपली पकड कायम ठेवणार, यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. निकाल काहीही असो, सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरणार हे मात्र निश्चित आहे.





