मालवण | प्रतिनिधी
मालवण शहरातील गवंडीवाडा प्रभागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून बंदिस्त पाईप गटारामुळे पाणी ओसंडून वाहण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या समोर येताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवासेना तालुका संघटक मंदार ओरसकर यांनी तत्परता दाखवत तातडीने उपाययोजना केली.
गावंडीवाडा प्रभागातील जोएल फर्नांडिस यांच्या घरासमोरील बंदिस्त पाईप गटाराची पाहणी करून ओरसकर यांनी संबंधित ठिकाणी आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली. गटारावर सिमेंट प्लेट ब्लॉक्स बसवून पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली. तसेच नागरिकांच्या ये-जा करण्यासाठीचा मार्गही सुस्थितीत करण्यात आला.
समस्या तातडीने निकाली निघाल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक मंदार ओरसकर यांचे आभार मानले.
यावेळी बबन वाघ, रोशन कांबळी यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.





