मालवण | प्रतिनिधी
महाविद्यालयीन जीवनाची नवी सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी ठरावी, या उद्देशाने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ आणि ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवोदितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत, विविध मनोरंजक उपक्रम, ‘मिस्टर फ्रेशर’ आणि ‘मिस फ्रेशर’ स्पर्धा तसेच महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देणारे मार्गदर्शन यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास राबते यांच्या हस्ते प्रत्येक नवोदित विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून नव्या विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये परस्पर परिचय वाढण्यास आणि महाविद्यालयीन वातावरणाशी सहज जुळवून घेण्यास मदत झाली.
कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या ‘फ्रेशर’ स्पर्धेत मुलांमधून मयुरेश कदम याने ‘मिस्टर फ्रेशर’, तर मुलींमधून श्रावणी चव्हाण हिने ‘मिस फ्रेशर’ हा बहुमान पटकावला. विजेत्यांचा उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात गौरव करण्यात आला.
उत्तरार्धात आयोजित ओरिएंटेशन सत्रात प्रा. डॉ. उज्ज्वला सामंत यांनी महाविद्यालयाच्या कोड ऑफ कंडक्टचे वाचन करून विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी आणि आदर्श वर्तणुकीचे महत्त्व पटवून दिले. विविध विभाग प्रमुखांनी आपल्या विभागांची माहिती, उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक संधी यांचा परिचय करून दिला.
यावेळी प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये आणि स्पर्धात्मक क्षमता वाढविणाऱ्या महाविद्यालयातील विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षणासोबत सर्वांगीण विकासावर भर देण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. एच. एम. चौगले यांनी केले. या कार्यक्रमाला आयक्यूएसी समन्वयक संग्रामसिंह पवार, प्रा. देविदास हारगिले, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. रोहिणी फाटक, प्रा. डॉ. एस. एस. बेळेकर, प्रा. मुंडले, प्रा. अनघा टिकले, कृतिका न्हिवेकर यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयक्यूएसी विभाग आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. नवोदित विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि उत्साहाने महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.







