पोईप, दि. ९ (वार्ताहर):
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोईप हायस्कूलने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली असून, प्रशालेच्या उर्वरित भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुमेधा पाताडे यांनी दिले. त्या पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. इं. द. वर्दम हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थी गुणगौरव व वार्षिक बक्षीस वितरण समारंभात बोलत होत्या.
संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मालवण पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उद्योजक सुरेश नेरुरकर, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब, संस्था सचिव विलास माधव, सत्यवान पालव, मोहन पांजरी, संदीप सावंत, कमलेश प्रभू, पंकज वर्दम, जितेंद्र परब, नितीन नाईक, राजाराम परब, आरटीओ निरीक्षक रत्नकांत ढोबळे, मुख्याध्यापक विकास कुंभार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सुमेधा पाताडे म्हणाल्या की, पोईप हायस्कूलच्या प्रगतीमध्ये संस्था, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचे सामूहिक योगदान आहे. पोईप दशक्रोशीतील विद्यार्थी मोठ्या विश्वासाने या प्रशालेत प्रवेश घेत असून, यापूर्वी येथून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वीही प्रशालेच्या विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुढेही आवश्यक भौतिक सुविधांसाठी सहकार्य सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत होत असलेल्या चर्चेचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, माध्यमिक शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळेतच घातला जातो. त्यामुळे प्राथमिक शिक्षक आणि शाळांच्या शैक्षणिक दर्जावर सरसकट प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही.
अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष अनिल कांदळकर यांनी सांगितले की, पोईप दशक्रोशीतील विद्यार्थी आणि पालकांनी प्रशालेवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरेल, यासाठी संस्था, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी अधिक जबाबदारीने कार्य करावे. दहावी, बारावी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी सन २०२५-२६ मधील विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आदर्श विद्यार्थी पुरस्कार रिया घाडीगावकर, हुशार व होतकरू विद्यार्थी पुरस्कार श्रवण परब, आदर्श शिक्षक पुरस्कार विष्णू महाजनी, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विठोबा माधव यांना प्रदान करण्यात आला. तसेच योगा पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल शिक्षिका केतकी सावंत, ऋतुजा राऊळ आणि शिक्षक संतोष तावडे यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि राकेश परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विकास कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू महाजनी आणि केतकी सावंत यांनी, तर आभार प्रदर्शन प्रसाद चव्हाण यांनी केले.







