नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज (दि. १५) निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार असून, येथे २३ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. पाचही राज्यांमधील मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आसाम (मतदारसंघ : १२६)
आसाममधील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १६ मार्च रोजी जाहीर होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २३ मार्च असून, २४ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यासाठी २६ मार्च पर्यंत मुदत असेल.
ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दुसऱ्या टर्मसाठी सज्ज आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुनरागमन करण्याच्या आशेवर आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे.
पश्चिम बंगाल ( मतदारसंघ २९४)
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात (१५२ जागा) ३० मार्चला अधिसूचना येईल, ६ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील आणि २३ एप्रिलला मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात (१४२ जागा) २ एप्रिलला अधिसूचना निघेल, ९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील आणि २९ एप्रिलला मतदान होईल. दोन्ही टप्प्यांसाठी अर्जांची छाननी अनुक्रमे ७ आणि १० एप्रिलला होईल, तर निकाल ४ मे रोजी एकत्रितपणे जाहीर केला जाईल.
२९४ विधानसभा मतदारसंघ असणारे पश्चिम बंगाल राज्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जात असून, तिथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुमारे ४८० कंपन्या (battalions) आधीच तैनात करण्यात आल्या आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की, केंद्रीय दलांच्या तैनातीचा निर्णय आता जिल्हा पोलीस प्रमुखांऐवजी आयोगाद्वारे नियुक्त केलेले पोलीस निरीक्षक जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून घेतील. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याच्या तयारीत आहेत, तर विरोधी पक्ष भाजप सत्तापालट करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरला आहे. येथील निवडणुका ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) नंतर होत आहेत, जो मुद्दा राजकीय वादाचा आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला विषय ठरला होता
तमिळनाडू (मतदारसंघ : २३४)
तमिळनाडूमध्ये निवडणूक अधिसूचना ३० मार्च रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ६ एप्रिल पर्यंत वेळ असेल आणि ७ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची मुदत ९ एप्रिल पर्यंत आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके (DMK) प्रमुख एम. के. स्टालिन सलग दुसर्यांदा सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना एआयएडीएमके (AIADMK) आणि भाजप युतीचा सामना करावा लागणार आहे. मात्र, यावेळचे मोठे आकर्षण म्हणजे अभिनेते आणि राजकारणी विजय यांनी त्यांच्या ‘टीव्हीके’ (TVK) पक्षासह राजकारणात एन्ट्री केली आहे. यामुळे राज्यातील निवडणुका तिरंगी होणार आहेत.
केरळम (मतदारसंघ : १४०)
केरळम विधानसभेसाठी निवडणूक प्रक्रिया १६ मार्च रोजी अधिसूचनेने सुरू होईल. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २३ मार्च असून छाननी प्रक्रिया २४ मार्च रोजी पार पडेल. उमेदवारांना आपले नाव २६ मार्च पर्यंत मागे घेता येईल.
केरळम येथे नेहमीप्रमाणे ‘डावे विरुद्ध काँग्रेस’ असा सामना रंगणार आहे. दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा असलेल्या या राज्यात सीपीएमचे ज्येष्ठ नेते पिनाराई विजयन सलग दुसर्यांदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे, पण अंतर्गत गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
पुदुचेरी (मतदारसंघ: ३०)
पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशासाठी १६ मार्च रोजी अधिसूचना काढली जाईल. इच्छुकांना २३ मार्च पर्यंत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर २४ मार्च रोजी अर्जांची तपासणी होईल आणि २६ मार्च पर्यंत अर्ज मागे घेता येतील.
केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथे ‘ऑल इंडिया एनआर काँग्रेस’ आणि मुख्यमंत्री एन. रंगासामी तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधी पक्ष डीएमके बदलासाठी जोर लावत आहे.






