मालवण (प्रतिनिधी):
मालवण तालुक्यातील आडवली पशुवैद्यकीय दवाखाना ते समर्थगड स्वामी समर्थ मठ–त्रिंबक घाडीवाडी सापळे मार्ग या रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रतीक्षा कायम आहे. या रस्त्याचे खडीकरण पूर्ण झाले असले तरी अद्याप डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करून पूर्ण करावा, अशी मागणी हजारो स्वामी भक्त तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान गतवर्षी आमदार निलेश राणे यांनी मठात भेट देऊन स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी सदर रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासित केले होते. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा रस्ता पूर्णत्वास जावा अशी मागणी आडवली समर्थगड मठाचे सर्वेसर्वा सुनिल घाडीगावकर (भाई महाराज) यांनी व्यक्त केली आहे.
मठात दर गुरुवारी हजारो भक्तांची उपस्थिती
या मार्गावर आडवली समर्थगड स्वामी समर्थ मठ असल्यामुळे येथे नियमितपणे शेकडो स्वामी भक्त दर्शनासाठी येत असतात. विशेषतः दर गुरुवारी रात्रीच्या महाआरतीसाठी सुमारे दोन हजारांहून अधिक भक्त उपस्थित राहतात, तर मे महिन्यात ही संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत पोहोचते.
जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या भाविकांना सध्या मातीच्या रस्त्यामुळे धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात ग्रामस्थांची वस्तीही असून अलीकडे नव्याने घरे बांधली जात आहेत.
लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा
या रस्त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य राजू परुळेकर तसेच इतर लोकप्रतिनिधींनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला आहे. या मार्गाचे अंदाजपत्रक प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आले असल्याची माहितीही मिळाली आहे.
आडवली ते त्रिंबक हे अंतर कमी करणारा हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने शासनाने तातडीने निर्णय घेऊन रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि स्वामी भक्तांकडून होत आहे.







