कोकणशक्ती, नवी दिल्ली – प्रतिनिधी
महायुद्धाच्या वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतात एलपीजी (LPG) आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत व्यक्त होत असलेल्या चिंतेवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा भक्कम असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देशात तेल आणि वायूचा पुरवठा सुरळीत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव (मार्केटिंग आणि ऑईल रिफायनरी) सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत देशाच्या इंधन स्थितीचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की, भारत कच्च्या तेलाच्या आयातीसाठी एका क्षेत्रावर अवलंबून नसून सुमारे ४० वेगवेगळ्या देशांतून तेल आयात करतो. देशाचा कच्च्या तेलाचा एकूण वापर सुमारे १८९ दशलक्ष मेट्रिक टन असून दररोज सुमारे ५५ लाख बॅरल तेलाची गरज भासते. जागतिक स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती असली तरी पुरवठा साखळीमध्ये कोणताही खंड पडलेला नाही. अलीकडेच भारतासाठी कच्च्या तेलाचे दोन मोठे कार्गो रवाना झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’वरील अवलंबित्व कमी
जागतिक राजकारणात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या स्ट्रेट ऑफ होर्मुज मार्गावरील संभाव्य जोखमीचा विचार करून भारताने पर्यायी पुरवठा मार्ग विकसित केले आहेत. सध्या भारताचे सुमारे ७० टक्के कच्चे तेल स्ट्रेट ऑफ होर्मुज व्यतिरिक्त इतर मार्गांनी देशात पोहोचत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे प्रादेशिक तणावाचा भारताच्या इंधन पुरवठ्यावर मर्यादित परिणाम होत आहे. तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या पीएनजी (PNG) आणि वाहनांसाठीच्या सीएनजी (CNG) चा पुरवठाही पूर्णपणे सामान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एलपीजीसाठी घाईची गरज नाही
गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर बोलताना शर्मा म्हणाल्या की, एलपीजी सिलेंडरसाठी ‘पॅनिक बुकिंग’ करण्याची कोणतीही गरज नाही. सध्या बुकिंग केल्यानंतर सरासरी अडीच दिवसांमध्ये, म्हणजे सुमारे ६० तासांत, सिलेंडरची डिलिव्हरी केली जात आहे. जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असली तरी भारतातील ऊर्जा पुरवठा स्थिर आणि नियंत्रणात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
होर्मुज परिसरात भारतीय जहाजांची सुरक्षा
सध्या होर्मुज परिसरात भारताची एकूण २८ जहाजे कार्यरत आहेत आणि त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे सरकारने सांगितले. यापैकी २४ जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या पश्चिम भागात असून त्यावर ६७७ भारतीय खलाशी कार्यरत आहेत. तर पूर्व भागात ४ जहाजांवर ११ भारतीय खलाशी आहेत. या सर्व जहाजांच्या हालचालींवर सरकारचे सतत लक्ष असून त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.







