सिंधुदुर्गनगरी – कुडाळ प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा आंबा आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर बागायतदारांनी नुकसानभरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. या आंदोलनाला राज्याचे मंत्री व पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः उपस्थित राहून प्रतिसाद दिला.
मोर्चात सहभागी झालेल्या बागायतदारांना संबोधित करताना राणे म्हणाले की, “बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही. त्यामुळे सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसह तुमच्या मोर्चाला सामोरे आलो आहे.”
90 टक्के पिकांचे नुकसान; अहवाल शासनाकडे
राणे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांचे यंदा सुमारे 90 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. यापूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेला चुकीचा अहवाल बदलून योग्य माहिती पाठवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनीही या नुकसानीचा तपशीलवार अहवाल शासनाला सादर केल्याची माहिती देण्यात आली.
नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. तसेच आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
औषध कंपन्या आणि दलालांवर नियंत्रण
बागायतदारांची औषधे व कीटकनाशकांमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकार स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही राणे यांनी सांगितले. औषध कंपन्या, दलाल आणि वितरण साखळीवर कडक नियंत्रण ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफी आणि व्याज सवलतीवरही निर्णय लवकर
बागायतदारांच्या कर्जमाफीबाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे राणे यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने व्याज सवलत जाहीर केल्याची माहिती देत, याबाबत शासनाकडूनही लवकरच दिलासादायक निर्णय जाहीर होईल, असे त्यांनी नमूद केले.
राजू शेट्टीं यांनी केले सरकारचे कौतुक
सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः मोर्चाला सामोरे जाऊन संवाद साधल्यामुळे आंदोलक बागायतदारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही या भूमिकेचे स्वागत करत सरकारचे कौतुक केले.
सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या मोठ्या नुकसानीनंतर सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत आहे. नुकसानभरपाई, कर्जमाफी आणि कृषी धोरणांबाबत लवकरच महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे







