मालवण (प्रतिनिधी)
मालवण देऊळवाडा-आडारी रोड परिसरातील भागात वारंवार कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त बनल्याने या भागात थ्री फेज लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांच्यासह नागरिकांनी केल्यावर याबाबत वीज वितरण कंपनीने आज कार्यवाही करत देऊळवाडा – आडारी रोड परिसरात थ्री फेज वीज लाईन बसवली आहे. त्यामुळे उमेश चव्हाण व नागरिकांनी वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहेत.
मालवण शहरातील देऊळवाडा- आडारी रोड भागात वारंवार कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक होण्याच्या घटना घडल्या होत्या. बऱ्याचदा येथे होणारा वीजपुरवठा खंडित होत होता. सतत होणाऱ्या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाल्याने तात्काळ थ्री फेज लाईन बसविण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांच्यासह राजू किर, श्याम आजगावकर, विशाल आजगावकर, स्वप्नील मालवणकर, अमित बोर्डवेकर, भूषण मुंबरकर, बाळू दाभोलकर आदी व इतर नागरिकांनी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केली होती. या मागणीची वीज कंपनीने दखल घेऊन या भागात थ्री फेज लाईन बसविण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहेत.







