मालवण (प्रतिनिधी) :
मराठी भाषेचे संवर्धन व जतन होण्यासाठी दैनंदिन जीवनात मराठी भाषेतून संवाद साधणे अत्यावश्यक असून आपल्या बोलीभाषाही निर्धास्तपणे वापरल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी यांनी केले. त्या मालवण येथील डी.एड. कॉलेजमध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलत होत्या.
डी.एड. कॉलेज, मालवण येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक सौ. पूर्वा शिरसाट, प्रा. आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी तसेच सौ. वैशाली चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूर्वा शिरसाट यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मेघना जोशी म्हणाल्या की, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषेचा जन्म झाला असून भाषेमुळे विचारांची देवाणघेवाण घडते. मराठी भाषा टिकविण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. विशेषतः पालकांनी आपल्या मुलांशी मराठीमधून संवाद साधल्यास नव्या पिढीत मराठीबद्दल आत्मीयता निर्माण होईल. मराठी भाषेची आवड वाढविण्यासाठी मराठीतील शब्द, वाक्ये व साहित्याचे सातत्याने वाचन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांमधून प्रतिक्षा माधव व ऐश्वर्या धुरी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कासले यांनी केले तर आभार प्रदर्शन दिशा चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.







