पनवेल (प्रतिनिधी) :
पनवेल ते कर्जत दरम्यान उभारण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी उपनगरी रेल्वे कॉरिडॉर आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या वर्षात या मार्गावर लोकल रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्हा तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-3) अंतर्गत साकारला जात असलेला सुमारे 29.6 किलोमीटर लांबीचा पनवेल–कर्जत दुहेरी रेल्वेमार्ग सध्या सुमारे ८५ टक्के पूर्ण झाला असून 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या नवीन मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे-मोहापे, चौक आणि कर्जत अशी प्रमुख स्थानके असणार आहेत. हा कॉरिडॉर हार्बर लाईनला मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाशी जोडणार असून मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कमधील सहावा महत्त्वाचा कॉरिडॉर ठरणार आहे.
या प्रकल्पातील विशेष आकर्षण म्हणजे सुमारे २.६ किमी लांबीची उपनगरी रेल्वेतील सर्वात मोठी बोगदा रचना तसेच अत्याधुनिक ‘बॅलेस्टलेस ट्रॅक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि कमी देखभाल खर्चाचा होणार आहे.
पनवेल–कर्जत लोकल सेवा सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार असून नवी मुंबई, कर्जत परिसर तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तसेच विद्यमान रेल्वेमार्गांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या मार्गावर तांत्रिक चाचण्या व अंतिम कामे पूर्ण झाल्यानंतर उपनगरी लोकल सेवा सुरू करण्यात येणार असून प्रवाशांमध्ये नव्या रेल्वेमार्गाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पनवेल–कर्जत कॉरिडॉरमुळे रायगड जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.





