मालवण (प्रतिनिधी) :
देवगड येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्या वतीने विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळची विद्यार्थिनी वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत जिल्हाभरातून एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. उत्कृष्ट कथाकथन सादरीकरणामुळे वैश्विका कदम हिने परीक्षकांची दाद मिळवत यश मिळवले.
स्पर्धेनंतर आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत तसेच साहित्यिका सौ. अनुराधा दीक्षित यांच्या हस्ते वैश्विका कदम हिला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
वैश्विका कदम हिच्या या यशाबद्दल संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, विभागप्रमुख डॉ. दयानंद ठाकूर तसेच सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







