युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून उपक्रम; माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती
कणकवली, दि. ८ : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जाणून घेण्यासाठी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी सोमवारी कणकवली महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. कणकवलीचे उपनगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्यांसमोर विविध शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांचा पाढा मांडला.
या कार्यक्रमास नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. सोमनाथ कदम, सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज खोचाडे, ॲड. अल्पेश भोईर, स्नेहा गावडे, मयूर पांचाळ, शिवसेना तालुकाप्रमुख राजू राठोड, तेजस राणे, कलमठ ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री आदी उपस्थित होते.
‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचे परिणाम आंदोलनांतून दिसले’
यावेळी वैभव नाईक म्हणाले की, मुंबई विद्यापीठ हे देशातीलच नव्हे तर जगातील नामांकित विद्यापीठांपैकी एक आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या शिवसेना प्रणीत सिनेट सदस्यांनी थेट महाविद्यालयात येऊन संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम अलीकडील विविध आंदोलनांतून पाहायला मिळाले आहेत.
‘झेन झी’समोरील समस्या वेगळ्या आहेत. मात्र, कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी शिक्षण आणि कष्ट हाच मार्ग आहे. आज येथे उपस्थित असलेले सिनेट सदस्यही चळवळीच्या माध्यमातून पुढे आले आहेत, असे वैभव नाईक यांनी सांगितले.
‘विद्यार्थ्यांच्या अडचणी विद्यापीठ स्तरावर सोडवू’
सुशांत नाईक म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिनेट सदस्य महाविद्यालयांमध्ये येतात, असे क्वचितच पाहायला मिळते. मात्र, शिवसेना प्रणीत सिनेट सदस्य आज थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांच्या मतांवर निवडून आल्याची जाणीव या सदस्यांना असून, विद्यार्थ्यांच्या अडचणी विद्यापीठ स्तरावर सोडविण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘विद्यार्थी आणि विद्यापीठातील दुवा म्हणजे सिनेट सदस्य’
सिनेट सदस्य ॲड. अल्पेश भोईर यांनी विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून सिनेट सदस्यांची भूमिका स्पष्ट केली. अलीकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी कुणालाही देणेघेणे नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. पेपरफुटीच्या प्रश्नावर जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनातून ‘झेन झी’ने आपली ताकद दाखवून दिली. या पिढीने खोट्या प्रचाराला उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांची पिढी समस्यामुक्त राहावी, या उद्देशाने आपण येथे आलो असल्याचे भोईर यांनी सांगितले.
कौशल्याधारित करिअरची गरज : मिलिंद साटम
सिनेट सदस्य मिलिंद साटम म्हणाले की, मुंबई विद्यापीठाला १६० वर्षांची परंपरा असून देशभरात त्याची स्वतंत्र ओळख आहे. सध्याच्या परिस्थितीत पदवीधरांसाठी उपलब्ध रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता कौशल्य विकसित करणे आणि आपल्या छंदातून करिअरच्या संधी शोधणे महत्त्वाचे ठरत आहे.
भारतामध्ये तरुणांची संख्या मोठी असून ही पिढी आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठविण्याची क्षमता ठेवते. अलीकडील विविध आंदोलनांतूनही तरुणाईची ताकद दिसून आली आहे, असे साटम यांनी नमूद केले.
अभ्यासक्रमातील बदल, शुल्क आणि डिजिटल शिक्षणाचे प्रश्न
यावेळी विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्यांसमोर विविध समस्या मांडल्या. ऐनवेळी अभ्यासक्रमात करण्यात येणारे बदल, एकाच वेळी विविध शुल्क भरण्याची प्रक्रिया, डिजिटल स्वरूपातील अभ्यासक्रमासाठी आवश्यक सुविधांची कमतरता आदी प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले.
विद्यार्थ्यांनी मांडलेले सर्व प्रश्न विद्यापीठ स्तरावर मांडून त्यांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन सिनेट सदस्यांनी दिले.






