कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळात स्व. प्रा. शरद वराडकर जयंतीनिमित्त काव्यगायन स्पर्धा व पुस्तक प्रदर्शन
मालवण, दि. ७ (प्रतिनिधी) : साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि साहित्यिक आपल्या लेखणीतून समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतो. अशा साहित्यिकाच्या प्रत्यक्ष कृतीतून शैक्षणिक क्रांती घडविणारे विद्यालय उभे राहत असेल, तर ते कार्य अजरामर ठरते. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक तसेच सामाजिक क्रांती घडत असून, या संस्थेतून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी घडविलेले उज्ज्वल भविष्य हीच या कार्याची खरी पोचपावती आहे, असे प्रतिपादन कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी केले.
कट्टा येथे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यालयात स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या जयंतीनिमित्त इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित काव्यगायन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात तसेच स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन सुधीर वराडकर, प्रशालेचे पर्यवेक्षक महेश विठ्ठल भाट, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अजयराज वराडकर यांनी योगात्मा डॉ. काकासाहेब वराडकर यांनी लावलेल्या शैक्षणिक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
काव्यगायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर संगीतमय प्रार्थनेने झाली. इंग्रजी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
काव्यगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिथिल विजय गुराम, द्वितीय क्रमांक उत्कर्ष वितेंद्र बोडये, तर तृतीय क्रमांक आदर्श विलास इंदप आणि विभा दर्पण मेस्त्री यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके ग्रीष्मा संदीप गोळवणकर, गौरांगी धनंजय वायंगणकर आणि खुशी गणेश वाईरकर यांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी भाषेत करण्यात आले. स्व. प्रा. शरद वराडकर यांच्या पुस्तकांचे आयोजित करण्यात आलेले प्रदर्शन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी इंग्रजी विभागप्रमुख किसन हडलगेकर आणि विषय शिक्षक एकनाथ राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनी यामिनी म्हाडगुत हिने सूत्रसंचालन केले, तर ईशा ताम्हणकर हिने आभार मानले.







