सिंधुदुर्ग उपकेंद्रातूनच सर्व शैक्षणिक सेवा द्या; मंदार शिरसाट यांची निवेदनातून मागणी
कुडाळ, दि. ८ : प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना सविस्तर निवेदन दिले. निकालातील त्रुटी, गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रांना होणारा विलंब, पुनर्मूल्यांकनाचे निकाल आणि सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार या प्रमुख प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे सिनेट सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत थेट संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध अडचणी मांडल्या.
सिंधुदुर्ग जिल्हा मुंबईपासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अथवा प्रशासकीय कामांसाठी वारंवार मुंबई विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसला जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या चार प्रमुख प्रश्नांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
निकालातील त्रुटी दूर करण्याची मागणी
अनेक परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत नसल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि रोजगार प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातच काही विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविणे, गुणांमध्ये तफावत किंवा अन्य त्रुटी आढळून येतात. अशा त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून निकाल प्रक्रिया अधिक गतिमान व अचूक करण्याची मागणी करण्यात आली.
गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रांचा विलंब थांबवा
परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रे वेळेत मिळत नसल्याची समस्या आहे. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा रोजगाराच्या संधींचा लाभ घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ही प्रक्रिया जलद करण्याची मागणी करण्यात आली.
पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत मिळावा
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर त्याचा निकाल पुढील परीक्षेचे अर्ज भरण्यापूर्वी अथवा पुढील परीक्षा सुरू होण्यापूर्वी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि मानसिक तणाव निर्माण होतो. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून निकाल वेळेत जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करा
मुंबई विद्यापीठाचे सिंधुदुर्ग येथे उपकेंद्र असतानाही अनेक शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबईतील मुख्य कॅम्पसवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राचा विस्तार करून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व शैक्षणिक व प्रशासकीय सेवा जिल्ह्यातच उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रमुख मागणी मंदार शिरसाट यांनी केली.
दरम्यान, संत राऊळ महाराज महाविद्यालयात झालेल्या थेट संवाद कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. सिनेट सदस्यांनी त्या जाणून घेत विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
मुंबई विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक अथवा प्रशासकीय अडचण असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन मंदार शिरसाट यांनी केले. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम, डॉ. धनराज कोहचाडे, ॲड. अल्पेश भोईर, नेहा निलेश गवळी, मयूर पांचाळ, आनंद वैद्य, अरविंद शिरसाट, महेंद्र गवस, प्राचार्य स्मिता सुरवसे, नगरसेवक मंदार शिरसाट, योगेश धुरी, अमित राणे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, विनय पालकर यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.







