सिंधुदुर्गातील युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
सिंधुदुर्ग, दि. ७ : राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आणि ‘मेरा युवा भारत’ (MY Bharat)च्या माध्यमातून ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग (VBYLD) 2027’ या देशव्यापी युवा सहभाग उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. देशाच्या विकासासाठी युवकांच्या कल्पना, विचार, दृष्टिकोन तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजनांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमाची सुरुवात १७ ऑगस्ट २०२६ रोजी ‘विकसित भारत क्विझ’ या पहिल्या टप्प्यापासून झाली आहे. देशभरातील अधिकाधिक युवकांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर या टप्प्यात भर देण्यात आला आहे. MY Bharat पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल स्वरूपात आयोजित करण्यात येणाऱ्या या क्विझमध्ये १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत युवकांना सहभागी होता येणार आहे.
‘विकसित भारत’च्या वाटचालीत युवकांना केवळ विकासाचे लाभार्थी न ठेवता सक्रिय योगदानकर्ते आणि भागीदार म्हणून सहभागी करून घेण्याची संधी या उपक्रमातून मिळणार आहे.
VBYLD 2027 चे पाच टप्पे
टप्पा १ – विकसित भारत क्विझ :
MY Bharat पोर्टलवर डिजिटल/ऑनलाईन क्विझ आयोजित करण्यात येणार असून, त्याचा कालावधी १७ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा आहे.
टप्पा २ – विकसित भारत निबंध स्पर्धा :
क्विझमधून निवड झालेल्या सहभागी युवकांना निश्चित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत’ विषयावर ५०० शब्दांचा निबंध सादर करावा लागणार आहे. ही स्पर्धा ५ ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे.
टप्पा ३ – जिल्हास्तरीय स्पर्धा :
प्रत्येक जिल्ह्यातील सर्वोत्तम ५० निबंधांची निवड करून संबंधित सहभागी युवकांना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी निवडले जाईल. हा टप्पा १० ते १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार आहे.
टप्पा ४ – राज्य/केंद्रशासित प्रदेश VBYLD :
जिल्हास्तरावर निवड झालेले युवक परीक्षकांसमोर आपल्या कल्पना व विचार मांडतील. त्यांच्या कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय फेरीसाठी राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील संघांची निवड केली जाणार आहे. हा टप्पा १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत होईल.
टप्पा ५ – राष्ट्रीय VBYLD :
VBYLD 2027 चा अंतिम राष्ट्रीय कार्यक्रम १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या युवकांना देशाच्या विकासासंदर्भातील आपल्या कल्पना आणि दृष्टिकोन मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रादेशिक स्तरावरील अंतिम फेरीतील सहभागी युवकांना पंतप्रधानांसमोर आपल्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे.
युवकांना सहभागाचे आवाहन
मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या वतीने जिल्ह्यातील युवकांनी ‘विकसित भारत क्विझ’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय युवा सहभाग उपक्रमाच्या माध्यमातून युवकांनी आपले ज्ञान, कल्पकता, नेतृत्वक्षमता आणि नाविन्यपूर्ण विचार देशाच्या विकासासाठी उपयोगात आणावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
VBYLD 2027, ‘विकसित भारत क्विझ’ तसेच ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2027’ संदर्भातील अधिकृत माहिती MY Bharat पोर्टलवर उपलब्ध असून, युवकांनी त्याचा संदर्भ घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा.







