The Heritage Tour Guide Certificate Course concluded in Malvan with 23 participants receiving certificates. Organizers announced plans to launch regular heritage walks from April to promote local heritage tourism and employment opportunities.
मालवण : प्रतिनिधी
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि लेखाशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या हेरिटेज टूर गाईड प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ११ ते २५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या अभ्यासक्रमात एकूण २३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला असून, यशस्वी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण होते, तर संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा कौशल्याधारित अभ्यासक्रमांमुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला.
चंद्रशेखर कुशे यांनी संस्थेमार्फत भविष्यातही विविध कौशल्यविकास अभ्यासक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगत, हेरिटेज वॉक आणि हेरिटेज टूरच्या माध्यमातून मालवणच्या पर्यटन क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याचे नमूद केले.
अभ्यासक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थींना व्याख्याने, पॉवर पॉईंट सादरीकरणे, क्षेत्रभेटी, प्रत्यक्ष हेरिटेज वॉक तसेच लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. मालवण व परिसरातील ऐतिहासिक आणि वारसा स्थळांना भेट देऊन माहिती संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे, मालवण शहरातील पहिला अधिकृत हेरिटेज वॉकही याच अभ्यासक्रमातून आयोजित करण्यात आला.
शंभर गुणांच्या अंतिम परीक्षेत प्रीती सुनील वैद्य यांनी प्रथम, सूर्यकांत दाजी कदम यांनी द्वितीय तर पूर्वा परेश तारी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्वप्निल मिटकर आणि निखिल तेली यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
प्रशिक्षणार्थी निखिल तेली, निखिल नेरकर, शैलेश सामंत, स्वप्निल मिटकर, सायली मयेकर, प्रीती वैद्य, हनुमंत हडकर आदींनी मनोगत व्यक्त करताना या अभ्यासक्रमामुळे वारसा पर्यटनाचे प्रत्यक्ष ज्ञान व हेरिटेज टूर गाईड म्हणून कार्य करण्याचा आत्मविश्वास मिळाल्याची भावना व्यक्त केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कैलास राबते यांनी आगामी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या, तर माजी प्राचार्य व बोर्ड ऑफ स्टडीज सदस्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयक्यूएसी सदस्य रुपेश तायशेटे उपस्थित होते.
अभ्यासक्रमाचे प्रास्ताविक संयोजक गुरुनाथ राणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. या उपक्रमासाठी अंबिका कॉम्प्युटर्स आणि एशियन इन्फोटेक यांचे प्रायोजकत्व लाभले. डॉ. योगेश पिसोळकर, डॉ. सुमेधा नाईक, डॉ. ज्योती बुवा तोरसकर आणि पर्यटन तज्ज्ञ गुरुनाथ राणे यांनी प्रशिक्षण दिले.
दरम्यान, एप्रिल महिन्यापासून मालवणमध्ये पर्यटकांसाठी नियमित हेरिटेज वॉक सुरू करण्याचा निर्धार संयोजक व प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला असून, या उपक्रमामुळे मालवणच्या वारसा पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.








