मालवण (प्रतिनिधी) :
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना कोकण विभागातून प्रतिष्ठेचा ‘लोकमंगल कृषी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. सोलापूर येथील वडाळा परिसरातील लोकमंगल सभागृहात आयोजित समारंभात सोलापूरचे आमदार शिवाजीबापू देशमुख यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ पद्मश्री श्रीरंग लाड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी फोंडेकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ३० हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य आणि संशोधनात्मक प्रयोगांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
गेल्या पाच वर्षांपासून हंगामातील प्रथम हापूस आंब्याची पेटी बाजारात दाखल करण्याचा मान मिळविण्यासोबतच जागतिक स्तरावर लक्ष वेधणाऱ्या लाल शेवग्याच्या निर्मितीतील यश ही त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आल्याची माहिती मालवण कृषी अधिकारी किशोर कदम यांनी दिली. जगभरातील संशोधकांना साध्य न झालेला लाल रंगाचा शेवगा विकसित करण्यात फोंडेकर यशस्वी ठरले असून त्यांच्या या संशोधनाला पेटंट अधिकारही प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी सखाराम पवार यांनी दिली. या पेटंटला देश-विदेशातील बी-बियाणे कंपन्यांकडून मोठी मागणी असून त्याची व्यावसायिक किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर बोलताना उत्तम फोंडेकर यांनी मालवण तालुक्यातील लुडबे, गावकर, गांगनाईक, करलकर तसेच वायरी येथील चव्हाण यांसह अनेक यशस्वी आंबा बागायतदारांकडून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच कृषी क्षेत्रात यश संपादन करता आले, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली.
फोंडेकर यांच्या या यशाबद्दल कृषी क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.








