दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी
मालवण, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार मालवण येथील दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) येथे शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती, मालवण आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपाची प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे.
यामध्ये राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था तसेच ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. आपली प्रकरणे आपापसातील चर्चा आणि सामोपचाराच्या माध्यमातून निकाली काढू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी संबंधित प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, मालवण कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वादपूर्व चर्चेद्वारे प्रकरणे निकाली काढू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी १२ सप्टेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहून लोकअदालतीच्या माध्यमातून आपले वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), मालवण तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे.






