मालवण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे ओरोस येथील क्रीडा संकुल जलतरण तलावात आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी जतीन संतोष करंगुटकर याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे जतीनची विभागीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली असून, तो विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जतीनच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







