विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; गणेशोत्सवानंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन
मालवण (प्रतिनिधी) : निवती लाईटहाऊस समुद्र परिसरातील पर्यटन नौका वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्याने अडचणीत आलेल्या जलसफर व्यावसायिकांना आमदार निलेश राणे यांनी दिलासा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा लाईटहाऊस जलसफर संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि जलसफर व्यावसायिकांनी मालवण येथील नीलरत्न निवासस्थानी आमदार राणे यांची भेट घेत विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून गणेशोत्सवानंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.
संघर्ष समितीने आमदार राणे यांना निवेदन सादर केले. निवती लाईटहाऊस जलसफरीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून शासनाचे नियम पाळून, लाईफ जॅकेटसह आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करून सुरू असल्याचे समितीने सांगितले. मात्र, प्रशासनाने जलसफरीवर काही निर्बंध लावल्याने स्थानिक रोजगार आणि या व्यवसायात झालेल्या मोठ्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांनी नमूद केले.
निवती लाईटहाऊस तसेच म्हातारीची चुळ परिसरातील जलसफरीसंदर्भात प्रशासनाने इनलँड व्हेसल्स (IV) अॅक्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या बोटींच्या पाच नॉटिकल मैलांच्या मर्यादेचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, निवती लाईटहाऊस जलसफर ही खोल समुद्रातील मासेमारीसाठीची वाहतूक नसून ४५ ते ६० मिनिटांची पर्यटन सफर असल्याने या परिसराला ‘स्पेशल टुरिझम झोन’ म्हणून अधिसूचित करून पाच नॉटिकल मैलांच्या अटीत शिथिलता द्यावी, अशी मागणी समितीने केली.
कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत जलसफारी पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, तसेच नोंदणी व परवानगी प्रक्रिया सुलभ करावी, अशीही मागणी करण्यात आली. यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (MMB) आणि संबंधित बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य निर्देश देण्याची विनंती समितीने केली.
या प्रश्नाबाबत आमदार निलेश राणे यांनी स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. जलसफर व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक पद्धतीने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. गणेश चतुर्थीनंतर मुंबईत वरिष्ठ बंदर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले जाईल, असे राणे यांनी सांगितले.
चर्चेनंतर काही प्रश्न तात्काळ मार्गी लागल्याने जलसफर व्यावसायिकांना दिलासा मिळाला. प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याबद्दल संघर्ष समितीचे सदस्य आणि पर्यटन व्यावसायिकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले. या प्रयत्नांना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
यावेळी बाबली चोपडेकर, बाबा मोंडकर, बबन शिंदे, विश्वास गांवकर, किसन मांजरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तसेच संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज खोबरेकर, उपाध्यक्ष प्रतिक कुबल, सचिव नागेश सारंग, खजिनदार सतीश टिकम, सहदेव साळगावकर, रामा चोपडेकर, रमेश कद्रेकर, संजय केळुसकर, गोरक्ष पराडकर, सूरज भोसले यांच्यासह देवबाग, तारकर्ली, कोचरा, निवती आणि भोगवे येथील जलपर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.






