IPPB-Niva Bupaची विशेष आरोग्य विमा योजना; १४९ रुपयांपासून विमा संरक्षण
सिंधुदुर्ग, दि. ११ : गंभीर आजाराच्या काळात उपचारांसोबत आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि Niva Bupa Health Insurance यांच्या सहकार्याने ग्राहकांसाठी ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार १ लाख, ३ लाख आणि ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण घेता येणार आहे. करासहित प्रीमियम १४९ रुपयांपासून सुरू होत असल्याने नागरिकांना आपल्या गरजेनुसार विमा संरक्षणाचा पर्याय निवडता येईल.
गंभीर आजाराच्या परिस्थितीत दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न सुरक्षा, कमाल तीन महिन्यांपर्यंत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आजारपणात उपचारांचा खर्च तसेच उत्पन्नातील घट यामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी या योजनेचा आधार मिळू शकतो.
कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या उपचारांदरम्यान वैद्यकीय सेवांसोबत आर्थिक सुरक्षितताही महत्त्वाची ठरते. या पार्श्वभूमीवर ‘जीवनदीप’ आरोग्य विमा योजना नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
“आजची सुरक्षितता, उद्याचे उज्ज्वल भविष्य” या संकल्पनेतून नागरिकांनी आरोग्य विम्याचे महत्त्व जाणून घेऊन आपल्या गरजेनुसार उपलब्ध विमा योजनेची माहिती घ्यावी, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.







