१२ ते २५ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहर व परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळता यावेत आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून कणकवली शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाला १४ सप्टेंबर २०२६ पासून सुरुवात होत असून, या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या संख्येने भाविक व नागरिक विविध वाहनांतून ये-जा करण्याची शक्यता आहे. तसेच गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी कणकवली शहर व परिसरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे वाहतूक बदल लागू केले आहेत.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
पटवर्धन चौक, कणकवली ते कलमठमार्गे आचरा जाणारी तसेच आचरा-कलमठमार्गे कणकवलीकडे येणारी अवजड वाहने या मार्गावर पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत.
हलक्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक
पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर या मार्गावरून कलमठमार्गे आचरा जाण्यासाठी तसेच कलमठमार्गे कणकवली बाजारपेठेकडे येण्यासाठी हलकी व इतर वाहने यांच्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करा
हलक्या व इतर वाहनचालकांनी लक्ष्मी चित्रमंदिर–किनई रोड–गांगोमंदिर–कणकवली बाजारपेठ रोड या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवांना सूट
या वाहतूक बदलाच्या आदेशातून पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सूट देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहनचालक व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले आहे.







