आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त ९ समुद्रकिनाऱ्यांवर अभियान; नागरिक, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी सहभागी होण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग : पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकारच्या राष्ट्रीय किनारा अभियान (National Coastal Mission) अंतर्गत आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक समुद्रकिनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत स्थानिक प्रशासनासोबतच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक मच्छीमारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देवगड, मालवण आणि वेंगुर्ल्यातील ९ समुद्रकिनारे
या स्वच्छता मोहिमेसाठी देवगड, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांतील विविध समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
देवगड तालुका : विजयदुर्ग, कुणकेश्वर आणि मिठबाव
मालवण तालुका : तारकर्ली, देवबाग आणि आचरा
वेंगुर्ला तालुका : भोगवे, शिरोडा आणि रेडी
देवगड तालुक्यात देवगड नगरपंचायत तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून, मालवण तालुक्यात मालवण नगरपरिषद व संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून, तर वेंगुर्ला तालुक्यात वेंगुर्ला नगरपरिषद व संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
शाळा, सामाजिक संस्था आणि मच्छीमारांचाही सहभाग
समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत संबंधित गटविकास अधिकारी, नगरपालिका व नगरपंचायत विभाग यांच्या सहकार्याने ग्रामपंचायती, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, स्थानिक मच्छीमार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रकिनाऱ्यांचे स्वच्छता व संवर्धन, समुद्री पर्यावरणाचे संरक्षण तसेच नागरिकांमध्ये किनारपट्टी स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने या मोहिमेला महत्त्व आहे.
संपर्कासाठी अधिकारी नियुक्त
देवगड तालुक्यातील ग्रामीण भागासाठी जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांचा मोबाईल क्रमांक ९४२०२५७६५५ आहे.
मालवण व वेंगुर्ला तालुक्यांतील शहरी भागासाठी विनायक औंधकर, जिल्हा सहआयुक्त, नगरविकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांची निवड करण्यात आली असून, त्यांचा मोबाईल क्रमांक ९९२२९२६६९३ आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून किनारपट्टी स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या या अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.







