Art teacher Sameer Chandarkar from Varadkar High School, Katta, was honored with the prestigious Kala Gaurav Award by Devrukh College of Art and Design for his outstanding contribution to art and education.
मालवण दि. (प्रतिनिधी):
कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर यांना कला व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देवरुख येथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन यांच्या वतीने प्रतिष्ठित ‘कला गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईनतर्फे आयोजित “संकल्पन २०२६” अंतर्गत १९ व्या वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने दिला जाणारा वार्षिक कला गौरव पुरस्कार संस्थेचे सचिव श्री. विजय विरकर यांच्या हस्ते समीर चांदरकर यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख पाच हजार रुपये देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार श्री. कुडलय्या हिरेमठ, जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईचे प्रा. श्री. प्रफुल्ल सातोकर, प्राचार्य श्री. रणजीत मराठे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
समीर चांदरकर यांनी कला व शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत DeCAD कला महाविद्यालयाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वराडकर हायस्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धेसह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रशालेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, शिक्षण मंत्रालय भारत सरकार व NCERT, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय समृद्धी स्पर्धेत ओडिशा येथील भुवनेश्वर येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक आकर्षक रांगोळ्या साकारल्या असून झी मराठी, सोनी टीव्हीसह विविध वाहिन्यांवरील रिएलिटी शोमधूनही आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे.
या कार्यक्रमास देवरुख कला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समीर चांदरकर यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







