सिंधुदुर्ग : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा तसेच वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान’ राबविण्यात येणार आहे. डोंगराळ आणि वनक्षेत्रालगतच्या भागात या संस्था असल्याने विद्यार्थ्यांचा साप, विंचू तसेच अन्य वन्यजीवांशी संपर्क येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंश हा अधिसूचित (Notifiable) आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांची वेळेत नोंद व अहवाल सादर करणे, त्यांचे निरीक्षण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे तसेच Anti-Snake Venom (ASV) उपलब्ध असलेल्या आणि त्याचा साठा असलेल्या आरोग्य संस्थांची माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे.
सर्पदंशाच्या वेळी योग्य प्रतिसादाचे प्रशिक्षण
अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य व वन विभागाच्या सहकार्याने किमान एक तासाचे विशेष जनजागृती सत्र घेण्यात येणार आहे.
या सत्रांमध्ये साप आढळल्यास सुरक्षित अंतर राखणे, शांतपणे त्या ठिकाणापासून दूर जाणे, सर्पदंश झाल्यास योग्य प्रथमोपचार करणे, अंधश्रद्धा व गैरसमज टाळणे, सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न न करणे, सर्पदंश झालेल्या व्यक्तीची हालचाल कमीत कमी ठेवणे आणि घाबरून न जाता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल करणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
शाळेच्या परिसरात जिवंत साप आणण्यास मनाई
विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातूनही सर्पदंश प्रतिबंध, सुरक्षित वर्तन आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद याबाबत तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जनजागृती सत्रादरम्यान कोणताही जिवंत साप शाळेच्या परिसरात आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करू नये, असे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
आपत्कालीन संपर्कांची माहिती अद्ययावत ठेवणार
आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांनी आपत्कालीन संपर्कांची माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे. यामध्ये जवळच्या आरोग्य संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक, ASV उपलब्ध असलेल्या किंवा त्याचा साठा असलेल्या आरोग्य संस्थेची माहिती, आपत्कालीन वाहतूक व्यवस्था व संपर्क क्रमांक तसेच स्थानिक सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक यांचा समावेश असेल.
अभियानाच्या कालावधीत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवालही संबंधित यंत्रणांना सादर करावा लागणार आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. या अभियानामुळे दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यां







