२,४५० शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण; नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर जमा होण्यास अडथळा
सिंधुदुर्ग, दि. ११ : जिल्ह्यात कडाक्याची थंडी तसेच अवेळी पावसामुळे आंबा व काजू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाच्या निर्देशानुसार आंबा व काजू बागांचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने आंबा व काजू पिकांसाठी नुकसानभरपाई मंजूर केली आहे.
नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. मात्र, पोर्टलवर नोंद असलेल्या २,४५० शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नसल्याने त्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळालेली नाही.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आंबा-काजू नुकसानभरपाईची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार आहे.
शेतकऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन विलंब न करता ई-केवायसी पूर्ण करावी, असे प्रशासनाने कळविले आहे.






