जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव; आगामी विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करणार
मालवण, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात टोपीवाला हायस्कूलच्या संघाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाचा पराभव करत जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. या दमदार कामगिरीच्या जोरावर टोपीवाला हायस्कूलचा संघ आगामी कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विजेत्या संघात ईश्वरी शिंदे, वीरा वारंग, धनश्री परब, सृष्टी सुकाळी आणि स्वरा लोंढे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष विष्णू कोरगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
टोपीवाला हायस्कूलच्या संघाने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक देवीदास वेरलकर, चंद्रशेखर बर्वे, तसेच मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत आणि ज्येष्ठ सदस्य दिगंबर सामंत यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छाही दिल्या.







