आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान
सिंधुदुर्ग : शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अनुसूचित जाती प्रमुखपदी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
अनुसूचित जाती समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सामाजिक उपक्रम, जनतेचे प्रश्न, बांधकाम कामगारांच्या समस्या तसेच संघटनात्मक कामात सक्रिय असलेल्या प्राजक्त चव्हाण यांच्यावर आता कुडाळ-मालवण मतदारसंघात अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गावागावात संघटनात्मक बांधणीचे आव्हान
पक्षासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्याच्या भूमिकेतून चव्हाण यांची निवड करण्यात आल्याचे मानले जात आहे. वाडी-वस्तीपासून बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत करणे, युवकांसह ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित करणे आणि नव्या नेतृत्वाला संधी देणे, हे त्यांच्या आगामी कामकाजातील प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.
युवकांचे प्रश्न, स्थानिक समस्या, सामाजिक विषय आणि कामगारांचे प्रश्न यावर सक्रिय भूमिका घेत अनुसूचित जाती विभागाची प्रभावी फळी उभारण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर असणार आहे.
“आमदार निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!”
“आमदार निलेश राणे साहेब आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पद मिळाले म्हणून थांबायचे नाही, तर या विश्वासाला कामातून उत्तर द्यायचे आहे. गावागावातील कार्यकर्त्यांना संघटित करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. नव्या युवा नेतृत्वाला संधी देत संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न राहील,” असा निर्धार प्राजक्त चव्हाण यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवण मतदारसंघातील अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






